Tuesday 23 February 2016

सार्वजनिक स्वच्छता: आधी स्वतःकडे बघा

आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या पुढाकाराने 'स्वच्छ भारत अभियान' सुरु झाले. साक्षात पंतप्रधानांनी हातात झाडू घेउन रस्ता झाडला आणि इतरांना उदाहरण घालून दिले. पंतप्रधान झाल्यापासून अनेक बाबतीत जनता मोदीजींचा आदर्श ठेवत आहे आणि मोदी कुर्त्यापासून अनेक गोष्टींचे अनुकरणही होत आहे. मग या बाबतीत ते झाल्यासच आश्चर्य होते. प्रत्यक्ष पंतप्रधान मोदीजींनी हातात झाडू घेतल्यामुळे आलेल्या देशात एक प्रकारची झाडलाट आली आणि त्यात इतर राजकीय नेत्यांपासून ते सरकारी खाजगी आस्थापनांतले अधिकारी, सिनेनट, नट्या आणि नटव्या, आणि अगदी ऑफिसातले शिपाई इथपर्यंत सगळे अक्षरशः झाडून सामील झाले आणि रस्त्यांवरचा आणि परिसरातला कचरा साफ करु लागले. इथे एक घटना आठवली. नक्की कधी ते आठवत नाही पण साधारण वर्षभरापूर्वी एका चीनी संकेतस्थळांवर भारतातल्या अनेक धार्मिक स्थळांवर कसा उकिरडा माजला आहे त्याची अनेक निवडक छायाचित्रे झळकली. चीनी संकेतस्थळ आहे म्हटल्यावर अनेकांनी देशभक्ती आणि चीनद्वेषातून 'चीन भारतावर कसे कसे हल्ले करत आहे आणि हे सुद्धा भारताचे पर्यटनातून मिळणारे उत्पन्न बुडवायचे कारस्थान कसे आहे' यावर तावातावाने त्यावर चर्चा करायला सुरवात केली. हे खरं आहे, मात्र अशी चर्चा करत असताना एक देश म्हणून गेली काही वर्षे आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचे वावडेच निर्माण झालेले आहे हे मात्र सोयिस्कररित्या विसरले गेले. भेळ खाल्ली, टाक कागद तिथेच. चणे-दाणे खाल्ले, टाक कागद तिथेच. प्लॅस्टीकच्या कपातून चहा प्यायला, टाक तो कप खाली तिथेच. पान, गुटखा, पानमसाला खाऊन यत्र तत्र सर्वत्र घातलेले ते मंगलाचे सडे हे तर प्रत्येक कोपर्याचे व्यवच्छेदक लक्षणच झालेले आहे. चालत्या गाडीतून विविध प्रकारचा कचरा बाहेर टाकणे याचा एक सुशिक्षित नमूना नुकताच बघितला. गाडीतून शहाळ्याचे पाणी पिऊन झाल्यावर शहाळे सरळ रस्त्यावर फेकून देण्यात आले. हे असंच सुरू राहिलं तर सगळा देश जरी झाडू घेऊन उभा ठाकला तरी कमी पडेल. तेव्हा या अभियाना अंतर्गत म्हणा किंवा स्वयंप्रेरणेने म्हणा, आपला परिसर जरूर स्वच्छ करा पण मुळात आपण वरील मार्गांनी कचरा करण्यास कारणीभूत ठरत नाही ना, याचा विचार करुन आधी अशा प्रकारच्या कचरानिर्मितीला पायबंद घाला. सुधारणा करायची असेल तर समोरच्याकडे बोट दाखवता आणि यंत्रणांना दोष देता स्वतःपासून सुरवात करा. तरच आपला देश स्वच्छ होऊ आणि राहू शकेल.

चला तर, आपणच आपला भारत स्वच्छ राखूया!

No comments:

Post a Comment